विशेष प्रतिनिधी । राजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी दुसऱ्या कामांसाठी वापरला जात असेल तर लग्न-समारंभासाठी गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच चुकीचं नाही असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे. आजही आपल्याकडे मंदिरात लग्न करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात किल्ल्यांना मंदिराच्याच पवित्रतेचा दर्जा आहे. त्यामुळे तिथे लग्न, समारंभ घेण्यात काहीच अडचण नसावी असं स्पष्टीकरण उदयनराजे यांनी पुढं दिलं आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ही कल्पना चांगलीच आहे, असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे.
माझी यासंदर्भात जयकुमार रावल यांच्याशी चर्चा झाली असून सरकारचं धोरण, सरकारच्या डोक्यातील कल्पना माध्यमांनी आणि विरोधकांनी विकृत पद्धतीने लोकांसमोर आणल्याने यासंदर्भात सरकारला अडचणीत यावं लागल्याचं उदयनराजे म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने ईव्हीएम घोटाळा केला असं सांगणाऱ्या उदयनराजेंना ईव्हीएमवर प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादीत काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे आपण तसं बोलून गेल्याची सारवासारव उदयनराजेंनी केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधी पक्षात असतानासुद्धा १५ हजार कोटींचा भरीव निधी साताऱ्याला दिला, त्यामुळेच मी भाजपसोबत आहे अशी स्पष्टोक्ती उदयनराजेंनी दिली.