हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी वळवण्याच्या निर्णयावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले असले तरी देखील सोलापूर मध्ये या आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाची धग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गोविंदबाग आणि अजित पवार यांचे निवासस्थानाची सुरक्षा आता वाढ होण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलन करणार होते. पोलिसांनी आधीच कारवाई करत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील ठिकाणीदेखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पाणी वळवण्याचा निर्णय रद्द
दरम्यान, इंदापूरला पाच टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र जोपर्यंत तसा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे. त्यानुसार उजनी धरण आणि पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळवणकर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकर्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळले आंदोलकांनी याचा निषेध व्यक्त केला.
सोलापूर, इंदापूर पाणी संघर्ष
उजनी धरणातील पाच टीएमसी पाण्यावरून सध्या पुणे विरुद्ध सोलापूरचा संघर्ष पेटला आहे या संघर्षाची धग मात्र थेट शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याला इंदापूरला हे पाणी वळवण्याचा तीव्र विरोध केला आहे. सोलापूर मध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी देखील या निर्णयाला विरोध केला होता. तसेच संघर्ष समितीने देखील या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे.