बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामधील खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकाची डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात घडली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव रमेश नरिभाऊ तिडके असे आहे. रमेश तिडके हे तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहेत. याबाबत संशयित आरोपी पुतण्या पंकज सुरेश तिडके याच्याविरूद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश तिडके यांची तालुक्यातील आकोली शिवारात शेती आहे. मागच्या काही दिवसांपासून काका रमेश आणि पुतण्या पंकज तिडके या दोघांमध्ये शेतीवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. काका आणि पुतण्याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली होती.
रविवारी दुपारी रमेश तिडके हे आपल्या शेतात काम करत होते. त्याच वेळी आरोपी पुतण्या पंकज त्या ठिकाणी आला. तेव्हा या दोघांमध्ये पुन्हा एकदा जमिनीवरून मोठा वाद झाला. या वादातून पंकजने रमेश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे रमेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. या प्रकरणी मृत रमेश यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हिवरखेड पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.