हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोका मूल्यांकनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमधील संकट अधिक गंभीर आहे कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. तसेच भारताविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. परंतु अशाही परिस्थितीत भारत पूर्वीपेक्षा अधिक लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देईल, अशी शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे .
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव हा खरं तर विशेष चिंतेचा आहे. यापूर्वी 2021 च्या सुरुवातीस दोन्ही बाजूंनी नियंत्रण रेषेवर पुन्हा युद्धविराम सुरू करण्यास सहमती दर्शविल्यानंतर दोन्ही देश त्यांचे संबंध मजबूत करण्यास उत्सुक असण्याची शक्यता आहे. परंतु ही गोष्ट जरी खरी असली तरी पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा मोठा इतिहास आहे. मात्र पाकिस्तानच्या चितावणीला मोदींच्या नेतृत्वाखाली भारत त्याच भाषेत चोख लष्करी प्रत्युत्तर देण्याची शक्यता जास्त आहे असं अहवालात म्हंटल आहे. वाढलेल्या तणावाच्या प्रत्येक बाजूची धारणा संघर्षाचा धोका वाढवते. काश्मीरमधील हिंसक अशांतता किंवा भारतातील अतिरेकी हल्ला हे संभाव्य फ्लॅशपॉइंट असू शकतात असेही या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात भारताला असलेल्या धोक्यांचेही मूल्यमापन करण्यात आले आहे. भारत-चीन द्विपक्षीय सीमा वाद संवादाद्वारे सोडवण्यात गुंतले आहेत, परंतु 2020 पासून दोन्ही देशांच्या सैन्यांमधील संघर्ष पाहता हे संबंध तणावपूर्ण राहतील असं या अहवालात म्हंटल आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमाभागात लष्कर तैनात केल्यामुळे संघर्षाची शक्यता वाढत आहे. त्यामुळे अमेरिकन लोक आणि हितसंबंधांना थेट धोका निर्माण होऊ शकतो, असेही अहवालात म्हटले आहे.