BREAKING NEWS : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. यानंतर आता आज पहाटे तीन वाजता त्यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली. या कारच्या मागे पुढे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या.जर या गाड्या पेटल्या असत्या तर तर मोठा अनर्थ झाला असता. गायकवाड कुटुंबाला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हा हल्ला करण्याअगोदर हल्लेखोरांनी या परिसरातील विद्युतपुरवठा तोडला होता. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून या घटनेची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

संजय गायकवाड यांचे हल्लेखोरांना आव्हान
‘रोखठोक काम करण्याचा, खरं बोलण्याचा माझा जो स्वभाव आहे, तो एखाद्याला पटला नसेल किंवा आज माझ्या मतदारसंघात जी धडाक्यानं कामं सुरू आहेत, ती गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत, ती एखाद्याला पाहवली नसतील म्हणून हा प्रकार केला गेला असावा. मात्र, हल्लेखोरांनी माझ्याशी सामना करावा. खुलेआम कुठेही बोलवावे. कुटुंबाशी खेळू नये. कुटुंबावर भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. तसेच पोलीस आपले काम करत असून लवकरच ते हल्लेखोरांना पकडतील,’ असा विश्वासदेखील संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment