हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एक विधान केले आहे. ‘‘राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याचे 18 कोटी सदस्य आहेत, त्यामुळे भाजपला काही फरक पडेल, असे नाही. अजित पवार आल्याने भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही, असे मिश्रा यांनी म्हंटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 जागांवर भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणणार आहे. त्याकरिता भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण, विश्वकर्मा योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे, असा विश्वास साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.
केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे प्रभारी अमर साबळे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी, सचिव विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री मिश्रा म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपला काही फरक पडेल, असे नाही. पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक कामे वरिष्ठ केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने सुरू आहेत. जो फरक पडणार, तो प्रादेशिक स्वरूपाच्या छोट्या-मोठ्या पक्षांना पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या 48 जागा असून, येथे आमचे 18 कोटी सभासद झाले आहेत.
या खासदारकीच्या सर्व जागा आम्ही खात्रीने निवडून आणणार आहे. सातारा हा कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता नाही. या पुढील निवडणुकीत साताऱ्यातील सर्व आमदार आणि खासदार भाजपचे असतील. साताऱ्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत असून, येथे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील, असे मिश्रा यांनी म्हंटले.