हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतून आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशीच राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. नायगाव येथील सभेत “कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो, 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच. शिवसेनेचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नसल्याची टीका राणेंनी केली आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आजपासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मंत्री राणेंनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विरोधाबाबत डाव्या उजव्याला बोलायला लावू नये, स्वत: बोलावं. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. आमची तशी ख्याती आहे. मांजरीसारखं आडवं येऊ नये. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणारच आहे. आणि शिवसेनेचा 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे.
जन आशिर्वाद यात्रेबद्दल मंत्री राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत, आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आम्ही शपथ घेतली आहे, त्याचं पालन करु. आम्हाला नियम शिकवण्याची गरज नाही. आम्ही कोरोनाचे नियम पाळत आहे, पालन करु. आम्हाला उपदेशाची गरज नाही.