पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवले म्हणाले. त्यासाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवलेंनी सांगितले. ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा रिपब्लीकचा प्रयत्न असणार आहे.
२ हजार ५०० वर्षांपूर्वी संपूर्ण भारत देश बौद्ध राष्ट्र होता. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत असल्याचे आठवले म्हणाले. याशिवाय भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मस्जिद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते असे आठवले म्हणाले. राम मंदिर, मस्जिद आणि बुद्ध विहार उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधनातील सर्व धर्म समभावाचा संदेश जगाला द्यावा असे आठवले म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”