अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील घटांग या गावाच्या हद्दीमध्ये एका २७ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत महिलेचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चिखलदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटांग पासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या कोकरू रोडवर रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर झाडीमध्ये या महिलेचा मृतदेह हा आढळला आहे. या मृत महिलेची ओळख पटली नसुन महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस सध्या घेत आहे. मेळघाट परिसरातील आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे. या अगोदर एकाच आठवड्यात नवजात बालके मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे पोलिसांच्या समोर मोठे प्रश्न उपस्थित झाले होते.
तर आज महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महिलेचे शरीर हे अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळून आले होते. त्यामुळे तिच्यावर बलात्कारासारखी अप्रिय घटना घडली असावी का? अशा पद्धतीच्या चर्चांना सध्या परिसरात ऊत आला आहे. मात्र एकाच आठवड्यातील सलगच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या अधिक तपास पोलीस करत असून परिसरात सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे.