हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओक्लाहोमा या राज्यातून आपली निवडणूक प्रचार रॅली पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ते टेक्सास, फ्लोरिडा, अॅरिझोना आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत आपला मोर्चा वळवतील. कोरोना या जागतिक साथीच्या विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या निवडणूक सभा तहकूब केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये होणार्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. विरोधी पक्ष डेमॉक्रॅटिक पक्षाचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन हे त्यांचे मुख्य विरोधक आहेत.
व्हाईट हाऊस येथे त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही आता आपल्या सभा पुन्हा सुरू करणार आहोत. गेल्या काही सभांमध्ये आम्हांला जबरदस्त पाठींबा मिळालेला आहे. ” ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही आमच्या प्रचार रॅली आता पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आम्ही ओक्लाहोमा येथील टुल्सा येथून प्रारंभ करू. ओक्लाहोमा हे एक सुंदर ठिकाण आहे. “ट्रम्प पुढे म्हणाले,” आम्ही फ्लोरिडालाही जाणार आहोत, टेक्सास तसेच फ्लोरिडामध्ये मोठ्या रॅली काढणार आहोत. या सर्व रॅली खूपच मोठ्या असतील. त्यानंतर आम्ही अॅरिझोनाला जाऊ आणि जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा आम्ही उत्तर कॅरोलिना येथे जाऊ. “
अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सर्वात जास्त गर्दी खेचणारे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या बिडेन यांच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्या सभांना जमविली आहे. व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी झालेल्या संभाषणावेळी ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर यांच्यावरही टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑगस्टमध्ये उत्तर कॅरोलिनामध्ये आपली राष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे.
ते म्हणाले की,” कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या वेळी उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर हे राज्य पुन्हा उघडण्यास खूपच उशीर करत आहेत.” ट्रम्प असेही म्हणाले की,” अनेक राज्यांना या परिषदेचे आयोजन करावेसे वाटते, त्यातील प्रमुख टेक्सास, जॉर्जिया आणि फ्लोरिडा ही राज्य आहेत.” एका मोठ्या निधी उभारणीच्या कार्यक्रमासंदर्भात अध्यक्ष ट्रम्प हे टेक्सासमधील डलास येथे जाणार आहेत. त्यांची शेवटची निवडणूक सभा हा २ मार्च रोजी शार्लोटमध्ये झाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.