हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा ऋतूला सुरुवात झाली की चाहूल लागते ती थंडीची. हा थंडीचा ऋतू येताच आपोआप गृहातील कपाटात ठेवलेली उबदार स्वेटर, चादरी बाहेर काढतो. उबदार वाटावं म्हणून आणि थंडीत आजारी पडू नये म्हणून अनेक उपाय करतात. त्याशिवाय अनेक लोक असेही असतात जे हिवाळा सुरू होताच घरात हिटरचा वापर करू लागतात. सध्या वाढत्या थंडीमुळे रूम हिटर्सचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेकदा हीटरचा वापर करत असतील तर काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. पाहूया त्या गोष्टी…
1) डोळ्यांचे होते नुकसान :
हिटरच्या अगदी जवळ बसल्यास डोळ्यांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. कारण आपल्या शरीरामध्ये अनेक संवेदनशील अवयव असतात. त्यातील एक अवयव म्हणजे डोळे. ते आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग तर आहेतच, पण त्यांची विशेष काळजीही घेणे आवश्यक आहे. मात्र, हिवाळ्यात हिटरचा सतत वापर केल्यास डोळ्यांचे नुकसानही होऊ शकते. खरंतर डोळे निरोगी रहावेत यासाठी ते ओले राहणं महत्वाचं आहे, मात्र हिटरमुळे हवेतील आर्द्रता अथवा ओलावा कमी होतो, ज्यामुळे डोळे देखील कोरडे होऊ लागतात. अशावेळी डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.
2) श्वासासंबंधी आजार होऊ शकतात :
थंडीच्या काळात घरात वापरल्या जाणारा हिटर केवळ हवेतील आर्द्रता कमी करत नाही, तर तो वापरत असताना अनेक हानिकारक गॅसही सोडले जातात. ज्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊन हानी पोहोचू शकते. अशावेळी हिटरच्या वापरामुळे श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय अस्थमाच्या रुग्णांसाठीही हिटरचा वापर घातक ठरतो.
3) त्वचेसाठी धोकादायक हिटर :
हिटरचा जास्त वेळ वापर केल्यामुळे आपल्या घरातील खोलीतील वातावरणातील ओलावा संपतो. हवेतील कोरडेपणामुळे त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. कोरड्या वातावरणामुळे त्वचेचा ओलावाही नाहीसा होतो आणि आपली त्वचा कोरडी पडू लागते. एवढेच नव्हे तर कोरडेपणामुळे त्वचा फुटण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोकाही लक्षणीयरित्या वाढतो.
4) काळजी घ्या अन्यथा होऊ शकते दुर्घटना :
थंडीच्या दिवसात हिटर खूप वेळ चालू ठेवल्यास त्याची बाहेरील बाजू गरम होते. ज्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. त्याशिवाय नॉन-मेटालिक हिटर जास्त गरम झाल्यास आजूबाजूच्या वस्तू, कापड किंवा प्लास्टिक वितळण्याचा किंवा जळण्याचा धोकाही असतो.
5) ‘या’ लोकांनी टाळावा हिटरचा वापर :
जर तुम्हाला दमा किंवा श्वसनासंदर्भातील कोणताही त्रास असेल तर तुम्ही हीटर वापरणे टाळावे. तुम्ही सामान्य हिटरऐवजी ऑइल हिटर वापरू शकता. यामुळे हवेत ओलावा राहतो. तसेच सायनस किंवा ब्राँकायटिसचा त्रास असेल तर त्या व्यक्तींनीही हिटरचा वापर टाळायला हवा. याशिवाय लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी हिटरपासून लांब रहावे.
हिटरचा वापरताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
- जर तुम्ही हिटर विकत घेत असाल तर ऑइल हिटर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. अशा हिटरमुळे हवा कोरडी पडत नाही.
2. रात्रभर हिटर सुरू ठेवून झोपू नये. झोपण्याच्या एक तास आधी हिटर लावून खोली गरम अथवा उबदार करावी. मात्र झोपताना हिचर आठवणीने बंद करावा.
3. जेव्हा आपण हिटर सुरु कराल, तेव्हा त्याच्या बाजूला एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवावे. त्यामुळे हवेत ओलावा राहील आणि कोरडेपणा टाळता येईल.
4. हिटर वापरत असल्यास, त्वचेला चांगले मॉयश्चरायझर लावावे, त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. तसेच डोळ्यांचा काही त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
5. दम्याचा त्रास असेल किंवा हृदयाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी हिटरचा शक्यतो कमी वापर करावा.