हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार असून मुंबईत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत.
उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्याच्या अनुषंगाने योगी आदित्यनाथ मुंबईत येत असल्याने या दौऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच मलबार हिल परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. योगी आदित्यनाथ हे आज सायंकाळी आणि गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.
उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशी ते बुधवारी सायंकाळी चर्चा करणार आहेत. गुजरातमध्ये उद्योग गेल्यानंतर योगाींचा हा मुंबई दौरा आता चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ स्वत: मुंबईत येणार आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री रवींद्र जायसवाल आणि उद्योग मंत्री नंदगोपाल नंदी असणार आहेत.