हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.
नाशिक येथे छगन भुजबळ यांनी प्रसिद्ध माध्यमांशी शनिवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसं जगवण्यासाठी मिळेल त्या लस घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पाहिलं नाही, असं सांगतानाच आपल्याकडेही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही हीच लस घ्या, आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहिजे पहिला. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांना द्या, असं भुजबळ म्हणाले. झालं गेलं विसरून आता पुढे गेलं पाहिजे. पुन्हा जोमाने लसीकरण केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
सुरुवातीला अनेकांनी रेडेसीवीर लस नेल्या. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. एक दोन दिवसात हा गोंधळ संपुष्टात येईल. ही काही क्रोसिनची गोळी नाही की लगेच मिळेल. सहज मिळणारं हे औषध नाही. त्यात अडचणी आहेत. राज्यभर अडचण अडचण आहे, हे मी नाकारत नाही. राज्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. कोरोनाचा ज्वालामुखी फुटेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे साठा केला नाही, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी निर्बंध पाळणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.