हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानांतर आता दुसरा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज म्हणजे २३ डिसेंबरला ओबीसी आरक्षणा वरून थेट विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत
प्रकाश आंबेडकर हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढणार आहेत
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७% राजकिय आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. तर इम्पिरिकल डाटा देण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ ठरल्यामुळे तसेच स्वतःजवळ असलेला डाटा देण्यास केंद्रातील भाजप सरकारने नकार दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकार ओबीसींच्या आरक्षणा बद्दल गंभीर नाही. त्यामुळे २३ रोजी वंचित कडून विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे