CAA, NRC विरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; वंचित बहुजन आघाडीची हाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा(CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC) आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली. या बंदला ३५ संघटनांनी पाठींबा दिला आहे.

देशाची आर्थिक परिस्थिती बिकट

देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

बंदला ३५ संघटनांचा पाठिंबा

सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबई व महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केले आहे त्या सर्वच संघटनांना वंचित बहुजन आघाडीने आजच्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ३५ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सीएए व एनआरसीसोबतच देशाच्या आर्थिक स्थितीवरही आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सर्वांचेच होते. त्यानुसार या सर्व मुद्द्यांवर मुंबईसकट महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

Leave a Comment