अकोला । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावरून चिमटा काढला आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहीत. ते तारीख आणि वेळही सांगतील, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत भाष्य केलं.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर राज्यातलं प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न केला असता ते म्हणाले कि, ‘आघाडी सरकार कधी पडणार हे मला माहीत नाही. मला एबीसीडीही माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांची माणसं आहेत तिथे. त्यामुळे त्यांना माहिती मिळते. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. त्यांना विचारा. ते तारीख, महिना, वेळ आणि वर्षही सांगतील, असा चिमटा आंबेडकरांनी काढला. ५ वर्षांपूर्वी जे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांना ५ वर्षानंतर घरी बसावं लागेल, असं स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या वादावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसच्या भूमीकेवर भाष्य केलं. आपला अपमान होतोय असं ज्या पक्षाला वाटतं त्यांनी सरकारमध्ये राहायचं की नाही हे स्वत: ठरवायचं आहे. निर्लज्जासारखं राहायचं असेल तर राहतील. अपमान वाटला असेल तर बाहेर पडतील. हा त्या त्या पक्षाने प्रश्न आहे. त्यांनीच त्याबाबत निर्णय घ्यावा, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रसेला लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’