हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित ८८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल असं त्यांनी म्हंटल आहे. गोवंडीत मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी वंचितच्या पाठीशी उभं रहा असं आवाहनही मुस्लिम मतदारांना केलं आहे.
मी जास्त काही बोलत नाही, मी फक्त ८८ जागांबाबत बोलत आहे. वंचित मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या ८८ जागा उभा करणार आहे त्याठिकाणी मुस्लिम समाजाने तर आम्हाला साथ दिली तर तुमच्या बदल झालेला दिसेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. तसेच मुस्लिम समाजात आता नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. मुस्लिम मतदारसंघात महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बदल झाला पाहिजे. आणि जर महापालिका निवडणुकीत मुस्लिमांनी आम्हाला मदत केली तर बदल घडून येईल, असा दावा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मात्र यावेळी आपण शिवसेना ठाकरे गटासोबत युती करून ८८ जागा लढवू की स्वबळावर ८८ जागा लढवणार हे मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेलं नाही, त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. कारण राज्यात गेल्या काही दिवसांपासून वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा आहे, मात्र उद्धव ठाकरे हे महाविकस आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. अशावेळी ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार याकडे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर ८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याने ठाकरे गटाकडून आता काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल.