हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या आदेशाला विरोध केल्यामुळे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत आपण कोणत्याही पक्षात न जाता मनसे सोबतच राहणार आहे असे स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याकडून अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद मागून घेतले होते. साईनाथ बाबर हे माझेच मित्र आहेत. मी नाराज नाही. गेली 25 वर्षे मी राज साहेबांसोबत काम करत आहे. पुण्याचं अध्यक्षपद गेलंंय. मात्र अजूनही माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही.
माझ्याशी अन्य पक्षांच्या लोकांनी संपर्क साधला आहे मात्र मी मनसे सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी माझ्या मनात अस विचार येईल त्या दिवशी मी उघडपणे सांगेल, असे वसंत मोरे यांनी म्हंटल.
तत्पूर्वी, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक पार पडली. यावेळी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवून साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत दिलेल्या आदेशाला विरोध केल्याचे वसंत मोरे यांना महागात पडले आहे. यापूर्वी वसंत मोरे हे मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडल्याचे माहीत समोर आली होती.
वसंत मोरेंची काय होती भूमिका-
वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.