नवी दिल्ली । वेदान्त समूहाने गुरुवारी सांगितले की, देशातील कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेदरम्यान सरकारला पाठिंबा देण्यासाठी वेदांत केअर्स उपक्रमांतर्गत कोविड -19 रूग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ‘हिंदुस्तान झिंक लिमिटेड’ आणि ‘ईएसएल’ या ग्रुप कंपन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे. तुतीकोरिन येथे देशातील सर्वात मोठी ऑक्सिजन उत्पादक कंपनी असलेल्या स्टरलाइट कॉपरने तामिळनाडू सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे संपर्क साधला आणि मदतीची ऑफर दिली आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. देशातील ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपला दररोज 1000 टन ऑक्सिजन क्षमता असणारा प्लांट सुरू करण्यास मान्यता मागितली आहे.
यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. हिंदुस्तान झिंकने उदयपूर आरोग्य प्रशासनास 1500 लिटर औद्योगिक ऑक्सिजन प्रदान केले आहे. कंपनीने राजपुरा दारिबा कॉम्प्लेक्स येथे असलेल्या औद्योगिक ऑक्सिजन प्लांटमधून 1000 लिटर लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. येथून कंपनी आपले मासिक ऑक्सिजन उत्पादन 100 टक्के रुग्णालयांना उपलब्ध करते. कंपनीने सांगितले की, सध्या ती दररोज पाच टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरवित आहे. कंपनी आपली क्षमता दिवसाला अतिरिक्त 2 ते 3 टन वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे.
वेदांत समूहाचे स्टील उत्पादक युनिट ईएसएलने बोकारोजवळील लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांटची नोंदणी केली आहे. ईएसएलने स्टील मंत्रालयाच्या गरजेनुसार दररोज 10 टन ऑक्सिजन पुरवण्याचे वचन दिले आहे. वेदांतने त्यांच्या कार्यकारी ठिकाणी स्थानिक प्रशासनाला आरोग्य सेवा पुरविली आहे. कंपनीने 5,000 हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लस देखील दिली आहे.