हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळीच छाप पाडली होती. किशोर नांदलस्कर यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. किशोर यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचे धडे मिळाले. त्यांचे वडील खंडेराव हे देखील नाटकांमध्ये काम करायचे.
किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकातून कामाला सुरुवात केली. तेच त्यांचं पहिला नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नाटकांमध्ये काम केले. तसेच त्यानतंर ते १९८० च्या सुमारास दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते. किशोर यांनी आपल्या कारकिर्दीत ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांचे व्यावसायिक रंगभूमीवरील शेवटचे नाटक ठरले. तसेच त्यांनी ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली, कुंकू हसलं’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली.
किशोर यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘हलचल’,’सिंघम’ या चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या भूमिका जरी छोट्या असल्या तरी तरी या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. किशोर यांना हृदयविकार तसेच मधुमेहाचा त्रास होता तसेच काही वर्षांपूर्वी त्यांची बायपाससुद्धा झाली होती.