ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या गोखले यांची आज प्रकृती खालावली आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले आहे. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

गेल्या काही काळापासून त्यांना घशाचा त्रास जाणवत होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केले आहे.

अभिनयाबरोबर लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातही काम

विक्रम गोखलेंनी अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी 2010 मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.