धायरीत मद्यधुंद डंपर चालकाची लोखंडी दुभाजक तोडून ज्यूसच्या हातगाडीसह रिक्षाला धडक

dhayri crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धायरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील धायरी या ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर लोखंडी दुभाजक तोडून रिक्षासह ज्यूस सेंटरच्या हातगाडीवर जाऊ आढळला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धायरी येथील मुक्ताई गार्डनजवळ घडली आहे. अविनाश कोंडीबा खंदारे असे या मद्यधुंद डंपर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी कि, धायरी फाट्याकडून भरधाव वेगाने येणारा एक डंपर मुक्ताई गार्डन जवळ लोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्यांमध्ये शिरला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या रिक्षालाही धडकला. या अपघातामध्ये रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात हातगाड्या व टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी केंचाप्पा जनवाड, मनोज राऊत हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकास ताब्यात घेतले.

पाच दिवसांपूर्वीदेखील धायरी येथील गणेश नगर परिसरातील मुक्ताई गार्डनजवळ पाण्याच्या टँकरखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता याच परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यधुंद डंपर चालकाचा थरार पाहायला मिळाला. या परिसरामध्ये डंपर चालक व टँकर चालक आपली वाहने बेदरकारपणे चालवतात. सिंहगड रस्ता पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.