औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्यामुळे अनेक गावांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने कोवीड केअर सेंटरद्वारे ग्रामीण भागात आठ हजार ८३२ बेड उपलब्ध केले आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांच्यावर घाटीत उपचार करण्यात येत आहेत.
शहरात दाट लोकसंख्या असल्यामुळे कोरोना समूह संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज चारशे ते पाचशे रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावे सुरक्षित असल्याचा अनुभव घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लाटेने चिंताक्रांत केले आहे.
कन्नड, सिल्लोड, पैठण तालुक्यांत रुग्णांची संख्या वाढली आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांना संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. या गावांमध्ये १५ ते २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ५० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावातील ग्रामस्थांची चाचणी करण्यात येणार आहे. सध्या ५० गावांत ‘कंटेन्मेंट झोन’ तयार केले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चाचणी आणि लसीकरण वाढवण्यावर भर दिला आहे. कोवीड केअर सेंटरमध्ये आठ हजार ८३२ बेड तयार आहेत. शहर आणि ग्रामीण भागात एकूण १४ हजार बेड आहेत. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे.
लसीकरणाच्या नियमात बदल करून ग्रामीण भागातील उपकेंद्रातही लसीकरण सुरू केले आहे. तसेच फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केल्यास संसर्गाला अटकाव होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी उपचार घेत आहेत. मागील वर्षी पाच महिन्यांनंतर असलेली परिस्थिती यावर्षी पहिल्या महिन्यातच असल्याचे खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने घाटी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांवर घाटीत उपचार करण्यात येत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group