हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच हा मूक मोर्चा नसून बोलका मोर्चा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला. मराठा आरक्षण रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. त्यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल. तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला.
बीडमध्ये राज्यातील पहिला मोर्चा ५ जून रोजी निघणार असल्याची घोषणा आमदार विनायक मेटेंनी केली होती. परंतु कोरोनाचा काळ पाहता या मार्चाचे काय होणार हा प्रश्न होता. दरम्यान, मोर्चा निघण्यावर रविवारी झालेल्या बैठकीत ठाम निर्णय घेतला गेला असून प्रशासनाने परवानगी नाकारली तरी हा मोर्चा होणारच आहे अशी घोषणा विनायक मेटे यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.