हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्यामुळेच एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. याचा मला आता पश्चाताप होत आहे. ते माझ्या आयुष्यातील मोठं पाप होत,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.
विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल नक्कीच संशोधन करावे लागणार आहे. ते सध्या कुणीतरी लिहून दिलेले ट्विट करण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली ती माझ्याच मध्यस्थीमुळे मिळाली होती.
मात्र, आता या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होतो आहे. आयुष्यातील मोठं पाप माझ्या हातून झाले आहे. त्यावेळेसच जर मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.