हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या खुलाशावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी या वृत्तास गुजारा देत एकनाथ शिंदे यांचा भांडाफोड केला . त्यावेळी एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली होती असं राऊत म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जे सांगितले ते खरं आहे. फडणवीस सरकार असताना भाजपकडून शिवसेनेची मुस्कटदाबी सुरू होती. भाजपने केलेल्या अन्यायाविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची समजून उद्धव ठाकरे यांनी काढली होती. एकनाथ शिंदे भाजपच्या जवळ कसे गेले हे इडीचे डायरेक्टर सांगू शकतात असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.
शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gSDHpIJfCe#hellomaharashtra @PawarSpeaks @supriya_sule
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 29, 2022
दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजप नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल. उद्धव ठाकरेंनी तसा निर्णय घेतला असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील. कारण तेव्हा एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरे होते असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना टार्गेट केलं.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले –
फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिला होता. आपण, म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु,असा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले.