मोदी अजूनही झोपेत आहेत; मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून भाजप नेत्यानेच थेट सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणावरून देशभरातील विरोधक मोदी सरकारवर आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) “INDIA” च्या आघाडीविषयी चर्चा करतात. मात्र त्यांना मणिपूरमधील घटनेवर प्रतिक्रिया देता येत नाही अशी जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच भाजपच्याच एका नेत्याने नरेंद्र मोदींवर टीका करत पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मोदी अजूनही झोपेत आहेत असं म्हणत बिहारमधील भाजप नेते आणि पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा (Vinod Sharma) यांनी राजीनामा दिला आहे.

विनोद शर्मा यांनी गुरुवारी मणिपूर घटनेनंतर सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत आपल्या पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच “मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही” अशा शब्दात शर्मा यांनी थेट मोदींना सुनावले आहे.

“भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे” अशी टीका विनोद शर्मा यानी भाजपवर केली आहे. सध्या मणिपूरच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेची सरकारकडून योग्य पद्धतीने दखल घेण्यात येत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते करत आहेत. गुरुवारी तर सरकारचा निषेध करण्यासाठी चक्क काळे कपडे घालून पक्षाचे खासदार संसदेच्या कामकाजात सहभागी झाले होते.

मणिपूरमध्ये काय घडले?

गेल्या ३ मे पासून मणिपूरमध्ये हिंसक घटनांना वळण लागले आहे. कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये सुरू झालेल्या या हिंसाचारात ४ मे रोजी दोन महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या. या दोन महिलांची मैतेई समुदायातील तरुणांनी रस्त्यावर नग्न अवस्थेत दिंड काढली. तसेच एका 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतरच संपूर्ण देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटले आहेत.