हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून कोहलीची ओळख आहे. विराट मैदानावर असेल तर भारत कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणारच असा विश्वास प्रत्येक चाहत्याला असतो हेच कोहलीचे खरं यश आहे. परंतु भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होण्यापर्यंत कोहलीला बराच संघर्ष आणि अथक परिश्रम घ्यावे लागले हे सुद्धा तितकंच खरं आहे. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया विराट कोहलीचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास …
विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. त्याच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली आणि आईचे नाव सरोज कोहली आहे. क्रिकेटच्या आवडीमुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी विराटला अकॅडमी मध्ये दाखल केलं. विराट कोहलीने 2002 मध्ये 14 वर्षाखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2004 मध्ये अंडर-17 आणि 2006 मध्ये त्याची अंडर-19 साठी निवड झाली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि सर्वप्रथम तो प्रकाशझोतात आला.
कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत तो भारताचा आघाडीचा फलंदाज आहे. विराटने आत्तापर्यंत 102 कसोटी सामन्यात 8074 धावा केलेल्या आहेत, 113 T20 सामन्यात त्याने 3932 धावा जमवल्या आहेत तर 262 एकदिवसीय सामन्यात तब्बल 12344 धावांचा रतीब घातला आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहलीने तब्बल 71 शतके ठोकली आहेत. याशिवाय IPL च्या 223 सामन्यात 6624 धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा विराटच्याच नावावर आहेत.
असं म्हणतात की, खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याच्या कारकिर्दीत एकदा तरी बॅड पॅच येत असतो. विराटच्या आयुष्यातही बॅड पॅच आला. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात विराटला 5 कसोटी सामन्यातील 10 इनिंग मध्ये अवघ्या 134 धावा करता आल्या. प्रामुख्याने ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट बाद व्हायचा. पण यानंतर विराटने कठोर मेहनत घेतली आणि तंत्रज्ञानात बदल करत पुन्हा आपला खेळ सुधारला आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याने 2018 च्या इंग्लंड दौऱ्यात 5 कसोटी सामन्यात तब्बल 593 धावांचा रतीब घातला,.
विराट कोहलीने भारताला अनेक अश्यक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. मागील आठवड्यात विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धही भारताच्या विजयच्या आशा जवळजवळ मावळल्याच होत्या. मात्र विराट कोहलीने खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला आणि भारतीयांची दिवाळी गोड केली. आत्तापर्यंत विराटला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामंध्ये ICC एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द ईअर, पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, विस्डेन क्रिकेटर पुरस्कार यांचा समावेश आहे. भारताच्या या स्टार फलंदाजाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..