नवी दिल्ली । विराट कोहलीची गणना भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले असतानाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. विराटने अनेक सामन्यांमध्ये भारताला एकहाती विजय मिळवून दिला, अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या मात्र त्याचवळी काही वेळा तो वादातही पुढे आला. विराटशी संबंधित 5 मोठ्या वादांवर एक नजर टाकूयात.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबत विराटचे संबंध चांगले नव्हते. 2017 मध्ये या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले होते. त्यानंतर कुंबळेला पदावरून हटवण्यामागे विराट कोहलीचा हात असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात होतं. एवढेच नाही तर विराटने कुंबळेच्या कोचिंगवर नाराजी व्यक्त करणारे अनेक ईमेल BCCI ला पाठवल्याचा दावाही त्यावेळी करण्यात आला होता. मात्र कुंबळेने हे पद सोडले त्यानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले.
विराट कोहलीची आक्रमक वृत्ती मैदानावर नेहमीच पाहायला मिळते मात्र अनेकवेळा त्याच्या या वागण्यामुळे तो वादातही सापडला आहे. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट आणि टीम पेन यांच्यात शाब्दिक युद्ध भडकले होते. एवढेच नाही तर मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या काही खेळाडूंशी विराटचे संबंधही चांगले दिसत नव्हते. इतकेच नाही तर एकदा विराट आणि केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर यांच्यात आयपीएलच्या एका मॅचमध्ये वाद झाला होता.
2015 मध्ये विराट त्याच्या वागण्यामुळे चर्चेत आला. वास्तविक, एका आर्टिकलवरून त्याने विमानतळावर पत्रकाराला शिवीगाळ केली होती. हा आर्टिकल अनुष्का शर्माबद्दल होता. मात्र, नंतर विराटने एका चुकीच्या पत्रकाराला टार्गेट केल्याचे दिसून आले. याबद्दल त्याने माफीही मागितली.
विराट आणि रोहित शर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचा दावा अनेकदा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. या दोघांपैकी कोणीही याबद्दल काहीही म्हंटलेले नाही. रोहितने विराट आणि अनुष्का दोघांनाही इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर याची सुरुवात झाली. रोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले मात्र विराटने सोशल मीडियावर काहीही लिहिले नाही.
विराट कोहलीही पत्नी अनुष्का शर्मामुळे वादात सापडला आहे. विराट मैदानावर खेळत असताना अनुष्का अनेकदा स्टेडियममध्ये दिसून आली. भारताच्या पराभवामुळे त्याला ट्रोल करण्यात आले असले तरी विराटनेही त्याला प्रत्युत्तर दिले. एकदा एका सामन्यादरम्यान अनुष्का थेट पॅव्हेलियनमध्येच पोहोचली होती, यावरून देखील वाद झाला होता. BCCI चा नियम आहे की खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅच ऑफिसर्स व्यतिरिक्त कोणीही मॅच दरम्यान पॅव्हेलियनमध्ये जाऊ शकत नाही. अशा स्थितीत नियम मोडल्याबद्दल विराटला लक्ष्यही करण्यात आले.