नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आपल्या घोषणेने सर्व चाहते आणि क्रिकेट जगताला चकित केले. टी 20 विश्वचषक 2021 नंतर विराट कोहलीने भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे कारण ताण असल्याचे सांगितले. विराट कोहलीच्या मते, तो गेल्या 5-6 वर्षांपासून तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळत आहे, त्यामुळे त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. मात्र, सुनील गावस्कर विराटचे कर्णधारपद सोडण्याचे कारण वेगळे असल्याचे सांगतात. सुनील गावस्कर म्हणाले की,”कदाचित बीसीसीआय आणि सिलेक्टर्स विराट कोहलीच्या टी -20 आणि एकदिवसीय कर्णधारपदावर समाधानी नाहीत, म्हणून त्याने एका फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर म्हणाले,”मी विराट कोहलीचे पत्र वाचले. रवी शास्त्री, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि सिलेक्टर्सशी बरीच चर्चा केल्यानंतर विराट कोहलीने टी -20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या 6 महिन्यांपासून त्याच्या टी -20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाबाबत बरीच चर्चा होते आहे. कदाचित विराट कोहलीला समजले असेल की, बीसीसीआय आणि सिलेक्टर्स त्याच्या वनडे आणि टी -20 कर्णधारपदावर खुश नाहीत. जे टी -20 कर्णधारपद सोडण्याचे एक कारण असू शकते.”
विराट कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात?
सुनील गावस्कर इशारा देत म्हणाले की,” विराट कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात आहे.” सुनील गावसकर म्हणाले,”विराट कोहलीने लिहिले की त्याला वनडे आणि कसोटीचे कर्णधारपद ठेवायचे आहे. मात्र आता सिलेक्टर्स त्याच्या वनडे कर्णधारपदाचा निर्णय घेतील. त्याच्या कसोटी कर्णधारपदाबाबत प्रश्नच नाही. मात्र एकदिवसीय कर्णधारपदामध्ये आताच बदल होणार की नाही हे आपण बघायला हवे.”
निवड समितीने विराट कोहलीला का निराश केले?
कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम खूप चांगला आहे. द्विपक्षीय मालिका असो किंवा विजयाची टक्केवारी, विराट कोहली कोणत्याही लिस्टमध्ये सर्वात वर दिसेल मात्र त्याने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 मध्ये वर्ल्ड कप आणि 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकू शकली नाही. आता जर विराट कोहली टी 20 विश्वचषक 2021 मध्येही अपयशी ठरला तर त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाच्या चर्चेची फेरी सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.