Vishwajeet Kadam : विश्वजित कदम भाजपात जाणार का?? व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vishwajeet Kadam : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत जवळपास १० ते १२ आमदार काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या. यामध्ये स्वर्गीय नेते पंतगराव कदम यांचे सुपुत्र आणि सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचेही नाव असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमात पसरत होत्या… यानंतर स्वतः विश्वजित कदम यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विश्वजित कदम नेमकं काय म्हणाले- Vishwajeet Kadam

अशोक चव्हाण यांनी अचानक दिलेल्या राजींनाम्यामुळे माझ्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वेदना झाल्या. परंतु अशोक चव्हाण यांच्या बातमीसोबतच माझ्याबाबतही उलटसुलट बातम्या येत आहेत, मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे असा गैरसमज पसरवला जात आहे. परंतु मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ज्या पलूस- कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पंतंगराव कदम साहेबाना भरभरून प्रेम दिले साठी दिली. त्याच पलूस- कडेगावच्या आमच्या मातांनी,, जेष्ठांनी,सर्वसामान्य लोकांनी मला सुद्धा विधासभेच्या माध्यमातून जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या जनतेला विश्वासात न घेता मी कोणतेही पाऊल टाकणार नाही असं विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी यामागील कारण सांगितलं नाही. परंतु मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे, आता मला वाटतं की, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. तसेच माझ्या मनात कोणाबद्दल सुद्धा वैयक्तिगत भावना नाही, कोणाचीही मला तक्रार करायची नाही तसेच मी कोणत्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही असेही त्यांनी सांगितलं.