हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
गेल्या महिन्या भरापासून अंधेरी पूर्व पोटनिवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यांनतर ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता होती मात्र त्यानंतर अचानकपणे भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके, अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून बाला नाडर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.