पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

खडकवासला धरण साखळीतील वरसगाव, पानशेत खडकवासला आणि टेमघर या चारही धरणांच्या परिसरात बुधवारी दिवसभर फारसा पाऊस पडला नाही. खडकवासला धरण परिसरात एक मिलिमीटर, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या क्षेत्रांत प्रत्येकी दोन मिलिमीटर आणि टेमघर धरण परिसरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या चारही धरणांच्या परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पानशेत आणि वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरण हे सुमारे ८० टक्के आणि टेमघर धरण हे सुमारे ९८ टक्के भरले आहे. पानशेत आणि वरसगाव या धरणांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास या धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुठा नदीकाठाजवळील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून, पावसाचे प्रमाण वाढल्यास या धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीकाठाजवळील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने या धरणातून रात्री साडेआठनंतर एक लाख ८० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांतून रात्री साडेनऊ वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. भाटघर धरणातून १४०० क्युसेक, नीरा देवघर धरणामधून ७०० क्युसेक, वीर धरणामधून २३ हजार ७८५ क्युसेक आणि गुंजवणी धरणामधून २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

Leave a Comment