मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून भाजपसोबत नातं तोडत शिवसेनेनं आता आघाडी सोबत संसार करण्याचे ठरविलं आहे. मात्र शिवसेना आघाडी कुटूंबात सामील होत असताना घरातील अन्य मित्रघटक पक्ष सदस्य आता दुर्लक्षिले जात आहेत. याबाबत महाआघाडीबरोबर विधानसभा लढलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी यांनी आपली खंत व्यक्त करताना सूचक विधान केलं आहे. राज्यात नवं सत्तासमीकरण तयार होत असताना घटक पक्षांना याबद्दल; विचारणाच झाली नसल्याचे शेट्टी यांनी सांगितलं आहे. आम्हाला अद्याप तरी शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेविषयी महाआघाडीतील कुणीही संपर्क केला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमचं ठरलंच नाही स्वाभिमानी पक्ष बहुमताच्यावेळी योग्य तो निर्णय घेईन, असंही शेट्टींनी स्पष्ट केल आहे.
राजू शेट्टी म्हणाले, ‘भाजप-शिवसेनाविरोधात तयार करण्यात आलेल्या आघाडीचा आम्ही भाग होतो. मात्र, महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नव्या समिकरणांविषयी आमच्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. आम्ही देखील कुणाशी संपर्क केला नाही. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. आम्ही त्यातच गुंतून पडलो होतो. त्यामुळे आम्ही कुणाशी संपर्क साधला नाही. मात्र, भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी जे करायला हवे ते करावे. आमचीही तिच भूमिका आहे.’
दरम्यान शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यांमधून ते काहीसे नाराज असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे आघाडीत आलबेल आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शेट्टी पुढे म्हणाले की, ‘तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम काय आहे, त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे की नाही हे पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.’