सांगली प्रतिनिधी । खानापूर मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकतरी काम विद्यमान आमदारांनी केलेले दाखवावे. अवैधधंद्यांना संरक्षण द्यायचे, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालून नकारात्मक राजकारण मतदारसंघात करत फक्त आडवा-आडवी जिरवा-जिरवीचे उद्योग करायचे, हा विरोधकांचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी केली.
खानापूर तालुक्यातील बलवडी, तांदळगाव, वाझर, खंबाळे, आळते येथे प्रचारदौऱ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते रामराव पाटील, अँड. बाबासाहेब मुळीक, निवास पाटील, चंद्रकांत पाटील, सुशांत देवकर, संजय मोहिते, आनंद पाटील, अमोल माळी, राजू जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार सदाशिव पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात विरोधकांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांना मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकही उठावदार काम करता आलेले नाही.
शिक्षणक्षेत्रात एखादे हायस्कूलसुद्धा उभारता आले नाही. मनुष्य वाईट नसतो त्याची प्रवृत्ती वाईट असते जे काही चाललंय ते सगळ मीच करतोय आणि माझ्या शिवाय होत नाही. तयार असणाऱ्या तीन मजल्यांच्या इमारतीवर चौथा मजला बांधून सर्व इमारत मीच बांधली अशी वल्गना करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.