‘100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम, पण आधी….’ – नितीन राऊतांचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊन काळातील वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यूत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. पण आधी मागच्या सरकारने जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यावर काम सुरू आहे, असं नितीन राऊत यांनी आज स्पष्ट केलं.

महावितरणची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. त्यामुळे या विषयावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. 100 युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असं राऊत म्हणाले.

वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने आंदोलन सुरू केलं असून मंत्रालयावरही मोर्चा आणण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यावर, भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र, केंद्राने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही, त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे 28 हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलाला माफी देऊ, असंही ते म्हणाले. (nitin raut on free power for those who consume up to 100 units)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment