मुंबई । महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेस प्रदेशध्यक्षपदी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही. पण संभावित प्रदेशध्यक्षपदी निवड होण्याआधीचं पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. “राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे”, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल”, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यापाठोपाठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. यासाठी नाना पटोले, काँग्रेस नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत. यात आता नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत खुद्द नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तत्पर असल्याचं म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’