सांगली प्रतिनिधी । आमदार अनिलभाऊ बाबर आणि सुहासनाना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलकडे पुन्हा एकदा खानापूर नगरपंचायतची सत्ता द्या. खानापूरच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी खानापूर नगरपंचायतला उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
खानापूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँगेस – शिवसेना महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, रवींद्र देशमुख, नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, पाच वर्षात सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रचंड विकासकामामुळे खानापूर शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. आमदार अनिलभाऊ बाबर, सुहासनाना शिंदे यांनी विकासासाठी २० कोटींचा निधी खेचुन आणल्यामुळे विकास झाला आहे.
आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले, खानापूरमध्येच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच उभारणार आहोत. खानापूर घाटमाथ्यावर टेंभू योजनेच्या पाण्यामुळे सुबत्ता आली आहे. भविष्यातही सर्व घाटमाथ्यावर पाणी नेणार आहे. खानापूरला एम आय आय डी सी होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा सुरू करणार आहे. खानापूर नगरपंचायत ला यापुढेही जास्तीत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.