कोल्हापूर प्रतिनिधी । ‘भाजपा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयाच्या ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
आज सकाळपासून ते कोथरुड मधील प्रत्येक मतदान केंद्रावर भेटी देऊन सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. तपोवन मैदानावरील सौ. शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयातील ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ”यापूर्वी २२० पार चा नारा दिला होता. परंतू आता मतदारांचा प्रतिसाद पाहता २५० पार होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा हि जागा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी होईल’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुण्याहून मी थेट मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी वेळेत पोहोचलो याचा आपल्याला आनंद असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.