मुंबई प्रतिनिधी | पर्यटनासाठी गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरून अनेक स्तरांवरून झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं.
“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग-१ आणि दुसरे वर्ग-२. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग-१ मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे वर्ग-२ मध्ये येतात.
वर्ग-१ चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.
मात्र वर्ग-२ चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये. ” असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंघल यांनी दिले आहे.