हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही काही ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यात मराठवाडा, विदर्भापेक्षा सुविधांच्या बाबतीत तुलनेनं वरचढ समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा मृत्यूदर हा सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर या जिल्ह्यांचा मृत्यूदर अधिक आहे. पुण्यात कोरोनानं हाहाकार घातलेला असला तरी पुण्याचा मृत्यूदरमात्र काहीसा कमी आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये असलेला मृत्यूदर हा स्थानिक प्रशासनासाठी चिंतेची बाब बनला आहे. राज्याबरोबर तुलना केली असता, एकूण मृत्युपैकी 27 टक्के मृत्यू हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुणे या दोन शहरांना सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र समोर आलं होतं. येथील रुग्णांची संख्या मोठी आहे. शहरी भाग, लोकसंख्या अशी अनेक कारणं त्यामागं आहे. पण इतर जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती सध्या सर्वाधिक गंभीर असल्याचं समोर आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण मृत्यूचा आकडा हा 16535 एवढा असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील मृत्यूच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त एवढा हा आकडा आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 38 लाखांच्या पुढं गेला आहे. त्यापैकी जवळपास 60 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत मृत्यूदर जवळपास 3 ते 4 टक्के होता. तो यावेळी कमी झाल्याचं चित्र देशभरात आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आकड्यांनी मात्र राज्याची चिंता वाढवली आहे.
देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा जवळपास 1.19 टक्के आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा फटका बसल्यामुळं महाराष्ट्राचा मृत्यूदर हा त्यापेक्षा जास्त म्हणजे 1.58 टक्के एवढा आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची मृत्यूची टक्केवारी ही धक्कादायक आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 3.15 टक्के तर जवळपास तेवढाच म्हणजे 3.13 टक्के एवढा मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. त्यानंतर सातारा 2.57 टक्के आणि सोलापूर 2.54 टक्के मृत्यूदर आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे पुण्या-मुंबईत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र असतानाही, याठिकाणचा मृत्यूदर मात्र अवघा 1.21 टक्के म्हणजे राज्यापेक्षाही कमी आहे.