क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली । बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण लोकं मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, आपल्या देशात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत धोरणात्मक अनिश्चितता आहे.

गुंतवणूकदाराने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये किती क्रिप्टो ठेवावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी सुचवले की, सद्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5-10% क्रिप्टो ठेवावे. त्यांनी गुंतवणूकदारांना संपूर्ण पैसे गमावण्याच्या जोखमीवरच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

सरकारचे धोरण आल्यानंतर क्रिप्टोमधील गुंतवणुकीची स्थिती जास्त स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनातच क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक विधेयक आणणार होते, मात्र अलीकडील रिपोर्ट्स नुसार, सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो एक्सचेंजचे नियमन करण्यासाठी विधेयक आणू शकते.

गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
> तज्ज्ञांच्या मते, पहिल्यांदाच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना ब्लू चिप क्रिप्टो एसेट्सचा विचार केला पाहिजे. त्यांची मार्केट कॅप जास्त आहे म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार त्यांचे क्रिप्टो होल्डिंग्स विकतात तेव्हा त्यांना त्यांचे ग्राहक सहज मिळतील.

>Reddit, Twitter यांसारख्या सोशल मीडियाच्या आणि इतर इंफ्लूएंर्सच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदारांनी क्रिप्टो खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊ नये.

> गुंतवणूक करण्यापूर्वी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक का करावी याचे उत्तर शोधावे. तत्काळ फायद्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तोटा होण्याची शक्यता वाढते. तज्ञ गुंतवणूकदारांना क्रिप्टोमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला 2-5 टक्के भांडवलाने सुरुवात करून नंतर नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

> क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य एक्सचेंज निवडा. योग्य एक्सचेंज आपल्या प्लॅटफॉर्मवर योग्य परिश्रम केल्यानंतरच कॉईन्सची लिस्ट बनवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका कमी होतो.

> गुंतवणुकदारांनी क्रिप्टो एसेटमध्ये उपलब्ध टोकन लिमिट देखील पाहावी. बिटकॉइन सारख्या अनेक क्रिप्टो मालमत्तेप्रमाणे, पुरवठा मर्यादित आहे मात्र Dogecoin ला जास्तीची लिमिट नाही.

> गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कॉईन्सचा पुरवठा तसेच त्याची विश्वासार्हता आणि त्याचे संस्थापक यांचा विचार करावा.

क्रिप्टोकरन्सी कुठे ठेवायची?
तुम्ही दीर्घकाळ क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास, तुम्ही तुमची क्रिप्टो एसेट्स स्टोअर करण्यासाठी हार्डवेअर एसेट्सचा विचार केला पाहिजे. मात्र, जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी किंवा थोड्या भांडवलासाठी गुंतवणूक करत असाल तर योग्य एक्सचेंज हा एक चांगला पर्याय असेल.

जर पोर्टफोलिओ लहान असेल तर क्रिप्टो एसेट्स एक्सचेंज वॉलेटमधून हार्डवेअर वॉलेटमध्ये हलवण्याची गरज नाही कारण या ट्रान्सफर मध्ये निश्चित शुल्काचाही समावेश असतो. मात्र, जर क्रिप्टोमध्ये गुंतवलेले भांडवल जास्त असेल तर ते ट्रान्सफर करणे चांगले आहे. एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठीचा ट्रान्सझॅक्शन चार्ज फिक्स आहे.