Tuesday, June 6, 2023

हिंदुस्थान फीड्सला नक्की झालंय तरी काय ? काम करा, नाहीतर निघून जावा; व्यवस्थापनाची जबरदस्ती उघड

टीम हॅलो महाराष्ट्र | साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत अडकलेले कामगार वारंवार फोन करुन कंपनीत सुरक्षित वाटत नसल्याचं सांगत आहेत. बिहारमधील या कामगारांना सोडण्यासाठी कंपनी काय प्रयत्न करतेय याविषयी कोणतीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने हिंदुस्थान फीड्सचं नक्की चाललंय काय? हा सवाल उपस्थित झाला आहे.

२ दिवसांपूर्वी साताऱ्यातील हिंदुस्थान फिड्समध्ये कामगारांना आपल्या गावी जाऊ देत नसल्याच्या बातमी समोर आली होती. या बातमीनंतर पोलीस प्रशासनाने कंपनीची अधिकृत भूमिका समजून घेतली होती. यानुसार १ तारखेला ट्रेन सुरु झाल्यानंतर या कामगारांना परत पाठवण्यात येईल असं कंपनी प्रशासनातर्फे बुधवारी सांगण्यात आलं. यानंतर गुरुवारी सकाळी या ठिकाणच्या कामगारांना इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या कामगारांना नक्की कुठं पाठवलं जातंय, गाडी नंबर काय आहे हे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाच्या सुचनेवरून गेटवरच अडवणूक करण्यात येत आहे. कंपनीला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीतील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दमदाटीचा प्रकार करण्यात आला आहे.

 

यानंतर घाबरलेल्या कामगारांनी स्वतः संबंधित घटनेचा व्हिडियो शूट करुन आमची सुटका करण्याची मागणी केली आहे. तुम्ही १ तारखेला जाणार असलात तरी आता कामावर रुजू व्हा, अन्यथा चालते व्हा असं कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं कामगारांनी स्वतः नमूद केलं. पोलीस निरीक्षक मांजरे यांच्याशी संवाद साधला असता, कामगारांना इतरत्र हलवलं जात असल्याची काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कंपनी प्रशासनाशी संवाद साधुन कामगारांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्याचा प्रयत्न हॅलो महाराष्ट्रकडून करण्यात येत असून कंपनीमार्फत मात्र काहीच उत्तर दिलं जात नाही. मॅनेजर श्री. फडके यांना २ दिवसांत तब्बल ८ ते १० कॉल केल्यानंतरही त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. कामगारांना असुरक्षित वाटत असल्याने या प्रकरणात तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.