औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला असता, अनेक कामात कुठलीही प्रगती नसल्याचे समोर आले. त्यामुळे मी सुटीवर असताना गेल्या आठ दिवसात तुम्ही काय काम केले? असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मी सांगितल्याशिवाय तुम्ही काम करणार नाहीत का? अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोना संसर्गामुळे महापालिकेत गेल्या दीड वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. आस्तिकुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून केल्या जाणाऱ्या कामांची यादी मोठी आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई वारंवार कामांचा पाठपुरावा करत आहेत. आयुक्त गेले आठ दिवस सुट्टीवर होते. १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमास ते हजर झाले. त्यानंतर दोन दिवस सुटीच होती. मंगळवारी (ता. २१) त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी विभागनिहाय कामाची प्रगती विचारली असता, कोणत्याच कामात प्रगती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कामे तशीच ठप्प असल्याने त्यांचा पारा चढला. मी सुटीवर असताना आठ दिवसात तुम्ही काय काम केले असे म्हणत पांडेय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मी सांगितल्याशिवाय तुमच्या फाईल हलणार नाहीत का? अशी विचारणा प्रशासकांनी केली. आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना घाम फुटला.
तसेच तुमच्याकडून कामे होत नसतील तर तसे सांगा, शासनाला कळवून अधिकारी मागवून घेतो, अशी तंबी देखील पांडेय यांनी बैठकीत दिली. ठरवून दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, प्रत्येकवेळी आदेशाची वाट कशाला बघता? ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करा असे आदेश पांडेय यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.