हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्य म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या बंडानंतर राज्यात चार गट पडले आहेत. यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट एका छताखाली तर ठाकरे गट आणि शरद पवार गट एकाच छताखाली असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधील भेटीदेखील वाढलेल्या दिसत आहेत. आता या भेटींमध्येच महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यात येत असल्याची माहिती जयंत पाटील यांनी आज दिली आहे.
नुकतीच इंडिया आघाडीची दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक शरद पवार यांच्या ‘6 जनपथ’ या निवासस्थानी पार पडली होती. या बैठकीच्या एक दिवस अगोदरच मुंबईत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी गेले होते. त्यावेळी या भेटीवरून अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. परंतु नक्की भेट कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती हे मात्र तिन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले नव्हते. मात्र आता जयंत पाटील यांनी याचं भेटीतील आतील मुद्दे उघडकीस आणले आहेत. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
जयंत पाटील यांची माहिती
आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांना भेटले. या बैठकीत वज्रमूठ सभांबद्दल चर्चा झाली. वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होतील. या बैठकांचं आता नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या वेगळ्या सभा होतील”
तसेच, “ठाण्याला आमच्या वज्रमूठची सभा होणार आहे, असा अंदाज आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन सभा ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय असेल याचा अंदाज लावला जात आहे.