मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि क्वारंटाईनचे नियम यामुळे भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतरसुद्धा इंग्लंडमध्येच राहणार आहेत.
याच दरम्यान भारताची अजून एक टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये ते वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहेत. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड करण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 जुलैला पहिली वनडे खेळवण्यात येणार आहे. दुसरी वनडे 16 जुलैला तर 19 जुलैला तिसरी वनडे खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजनंतर टी-20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. 22 जुलै पहिला टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. 24 जुलैला दुसरा टी-20 सामना तर 27 जुलैला तिसरी टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे.
एक देश, दोन टीम
या अगोदरसुद्धा भारतीय टीम एकाच वेळी दोन दौऱ्यांवर गेली होती. 1998 साली पहिल्यांदा क्रिकेटला कॉमनवेल्थ खेळामध्ये सामील केले गेले. याच दरम्यान भारताला सहारा कपमध्येदेखील खेळायचे होते. या दरम्यान एक टीम मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात सहारा कप खेळली होती तर दुसरी टीम अजय जडेजाच्या नेतृत्वात कॉमनवेल्थ गेम खेळली होती. अजय जडेजाच्या टीममध्ये सचिन तेंडुलकर, रोहन गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांचा समावेश होता तर मोहम्मद अझरुद्दीनच्या टीममध्ये सौरव गांगुलीचा समावेश होता.