मुंबई | देशभरातील संचारबंदी १९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी घेतल्यानंतर देशभरात पुन्हा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर राज्य सरकारांनी काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या जिल्हानिहाय प्रादुर्भावाचा विचार करुन राज्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही व्यवसाय आजपासून सुरु होणार आहेत.
यामध्ये आयुषसह सर्व आरोग्य सेवा, काही व्यावसायिक आणि खाजगी आस्थापने, जिल्ह्यांतर्गत प्रवास करत मजुरांना काम करण्याची मुभा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने, आयटीमधील ५०% लोकांना काम सुरु ठेवण्याची मुभा, वर्तमानपत्रे, यांत्रिक दुरुस्ती सेवा, फळभाज्यांची दुकाने, साफ-सफाई सामान विक्री दुकाने, दूध आणि दुधाशी संबंधित अन्य पदार्थांची दुकाने, मांस विक्री करणारी दुकाने, रोजगार हमी योजनेची कामे, मालाची वाहतूक सेवा आणि केंद्र, राज्य व जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आजपासून सुरु राहणार आहेत.
तर बंद असणाऱ्या सेवांमध्ये प्रवासी रेल्वे वाहतूक, सार्वजनिक बस सेवा, विमान वाहतूक, आंतरराज्य व्यक्तिगत प्रवास, ई-कॉमर्स कंपन्यांच्या अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या वस्तू, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, जिम, सर्व धार्मिक स्थळे, शाळा-कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस यांचा समावेश होईल. व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीसुद्धा केवळ २० च लोकांना सोशल डिस्टनसिंग राखत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकंदरीतच भान ठेवून लॉकडाऊन पाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आता नागरिक याला कसा पाठिंबा देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”