विशेष प्रतिनिधी । अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळी सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसध्ये दिवाळी साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. याआधी २००९ पासून बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. ट्रम्प हे गुरुवारी दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या उत्सवास सुरुवात करतील. २०१७ मध्ये व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात त्यांनी दिवाळी साजरी केली होती. उद्याच्या दिवाळी कार्यक्रमास त्यांच्या प्रशासनाचे सदस्य व भारतीय अमेरिकी समुदायाचे नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना दिवाळीसाठी निमंत्रित केले होते. सध्या अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांनी दिवाळीचा उत्सव सुरू केला आहे.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबोट यांनी भारतीय समुदायाच्या लोकांसमवेत शनिवारी दिवाळी साजरी केली. एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही गव्हर्नरांच्या राजप्रासादात दीपप्रज्वलन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेक्सास दौऱ्यातील आठवणींना उजाळा देण्यात आला. टेक्सासचे रिपब्लिकन सदस्य पीट ओलसन यांनी म्हटले आहे की, स्वामीनारायण मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. हिंदू स्वयंसेवक संघाने सोमवारी सांगितले की, पूर्ण ऑक्टोबर महिन्यात चालणाऱ्या दिवाळी महोत्सवात सात हजार लोक सहभागी आहेत.