राष्ट्रवादी साहेबांची की दादांची? ऑक्टोंबरमध्ये निवडणूक आयोगात सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील राष्ट्रवादीत बंड पुकारला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आलेल्या आमदारांना देखील आपल्या बाजूने करून घेतले. पुढे जाऊन अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली. आता राज्यात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी देखील दोन गट पडले आहेत. यातील पहिला गट शरद पवार आणि दुसरा गट अजित पवार यांचा आहे.

मुख्य म्हणजे, या दोन्ही गटाच्या आमदारांकडून आणि नेत्यांकडून राष्ट्रवादीवर आणि त्याच्या चिन्हावर अधिकार दाखवला जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेमकी कोणाचे हा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता एवढा टोकाला पोहोचला आहे की याची सुनावणी थेट निवडणूक आयोगाच्या दरबारात केली जाणार आहे. होय, पुढील ऑक्टोंबर महिन्यात याप्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी आणि त्याच्या चिन्हावर नेमका कोणाचा अधिकार असेल हे ठरवण्यात येईल.

अजित पवारांचा पक्षावर आणि चिन्हावर दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीवर सारखाच हक्क दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आमदार देखील अजित पवार गटात गेल्यामुळे दोन्ही गटात वादाची ठिणगी पेटली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी निवडणूक आयोगासमोर पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. यावर आयोगाने शरद पवार यांच्या गटाला 8 सप्टेंबर पर्यंत लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे शरद पवार यांच्याकडून तसे उत्तर देखील देण्यात आले. या लेखी उत्तरात शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले.

ऑक्टोंबर महिन्यात सुनावणी

आता शरद पवार यांच्याकडून लेखी उत्तर निवडणूक आयोगात सादर झाल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आयोग राष्ट्रवादी पक्षाच्या आणि चिन्हाच्या वादावर सुनावणी करेल. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. त्यामुळे या सुनावणीत आयोग कोणाच्या बाजूने निकाल देईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर निवडणूक आयोगाने या सुनावणीत अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला तर याचा मोठा फटका आगामी निवडणुकांसाठी शरद पवार यांना बसू शकतो.