आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला – भाजप आमदार सुरेश धस

बीड- बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविड च्या काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मच्याऱ्यांना निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे.

आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे, असा आरोप नर्सेसनी केला.

दरम्यान,या घटनेमुळे आता राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. लाठीमाराच्या प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र शब्दात नाराज व्यक्त केलीय. ‘हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं. त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता. मागण्या तर पूर्ण होत नाहीत, पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी  टीका केली आहे.

You might also like